जीएसटी करदाता सेवा महासंचालनालय, मुंबई (DGTS) आणि केंद्रीय जीएसटी ,कोल्हापूर आयुक्तालय यांच्या वतीने येथील सातारा एमआयडीसीमध्ये जीएसटी नोंदणी आणि करदात्यांना येणाऱ्या अडचणींवर उपाय या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
केंद्रीय जीएसटी, कोल्हापूर चे आयुक्त सुमितकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सत्रात केंद्रीय जीएसटी, सातारा चे उपायुक्त विजय सिंह तसेच डीजीटीएस चे सहाय्यक संचालक डॉ. प्रदीप झारिया यांचे सह केंद्रीय जीएसटी, सातारा विभाग आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ टॅक्सपेअर सर्व्हिसेस मुंबई युनिटचे वरिष्ठ अधिकारी, तसेच स्थानिक करदाते, सीए, कर सल्लागार आणि उद्योजक यांनी एकत्र येऊन कर प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली.
या वेळी केंद्रीय जीएसटी, सातारा चे उपायुक्त विजय सिंह यांनी सर्व सहभागी प्रतिनिधींना नोंदणी प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणीबाबत म्हणणे सादर करण्याचे आवाहन केले.परस्पर विश्वास, पूर्ण पारदर्शकता आणि ऐच्छिक कर पालनावर आधारित एक मजबूत कर प्रणाली उभारण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच, करदात्यांच्या सर्व रास्त समस्यांचे निवारण करण्यासाठी विभाग नेहमी तत्पर, सुलभ आणि प्रतिसाद देणारा राहील, अशी ग्वाही सर्व भागधारकांना दिली
डीजीटीएस चे सहाय्यक संचालक डॉ. प्रदीप झारिया यांनी जीएसटी नोंदणीचे महत्त्व अधोरेखित केले. कर नियमांचे पालन करून अधिकृत कर कक्षेत समाविष्ट झाल्याने व्यापारी वर्गाला दीर्घकालीन वाढीच्या संधी आणि व्यावसायिक फायदे मिळतात, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, उपस्थित अधिकाऱ्यांनी कर सल्लागार आणि व्यापारी संघटनांना बोगस/ बनावट नोंदणी शोधून काढण्यात आणि जीएसटी व्यवस्थेचा गैरवापर रोखण्यात विभागाला सहकार्य करून 'सुशासनाचे भागीदार' म्हणून काम करण्याचे आवाहन केले. या वेळी करदाते, सनदी लेखापाल आणि कर सल्लागार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.