कर चुकवेगिरी करणाऱ्या जालना शहारातील एका बड्या बांधकाम कंत्राटदाराच्या कार्यालयावर तसेच घरी वस्तू व सेवाकर विभागाच्या ( जीएसटी ) पथकाने छापेमारी सूरू केली. दरम्यान, या कारवाईमुळे कर चुकवेगिरी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.
जालना शहरात व्यापार, उद्योग, बांधकाम व्यवसाय मोठया प्रमाणात चालतो. जालना हे स्टील व्यापाराचे मोठे केंद्र असल्यामुळे येथे जीएसटी विभाग, प्राप्तीकर विभागाकडून काही व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार कर चुकवेगिरी करीत असल्याच्या संशयावरून जीएसटी विभागाच्या पथकांकडून शहरात अधूनमधून छापेमारी केली जाते.
गेले अनेक दिवस जीएसटी पथक शहरात ठाण मांडून बसले होते. दरम्यान , या पथकाने कमालीची गोपनीयता पाळली असून आतापर्यंत या छापेमारीमध्ये नेमके काय हाती लागले आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती या पथकाकडून देण्यात आली नाही. मात्र राज्य जी एस टी विभागाच्या मुंबई येथील पथकाकडून हे छापे टाकले असे जाणकारांनी सांगितले.अजून काही बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदारांच्या कार्यालयावर या पथकाकडून झाडाझडती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.