मा.मुंबई आयकर अपीलीय न्यायाधिकरण यांच्या खंडपीठाच्या अलीकडील 17 मार्च 2025 च्या निकालात म्हटले आहे की, चालू पुनर्विकास निवासी प्रकल्पात पूर्वीच्या विद्यमान निवासी सदनिकाच्या जागी नवीन सदनिका घेणे हे आयकर कायद्याच्या कलम ५६ अंतर्गत करपात्र नाही , जे "इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न" या शीर्षकाखाली उत्पन्नाशी संबंधित आहे.
खंडपीठाच्या मते, ही देवाणघेवाण केवळ "जुन्या सदनिका मधील अधिकार संपुष्टात येणे" असून ते "अपुऱ्या मोबदल्यात स्थावर मालमत्तेची मिळवणे" म्हणून समजले जाणार नाही. दुसऱ्या शब्दांत, केवळ जुन्या सदनिकेची नवीन सदनिकासाठी देवाणघेवाण केल्याने कोणतेही करपात्र उत्पन्न मिळत नाही.
यातील अपील कर्त्या करदात्यानी १९९७-९८ मध्ये एका सहकारी सोसायटीमध्ये एक सदनिका खरेदी केली होती . विकासकासोबतच्या करारानुसार, सोसायटीने पुनर्विकास केला. त्यांच्या अटींनुसार, डिसेंबर २०१७ मध्ये करदाते यांना त्यांचा जुना फ्लॅट परत करण्याऐवजी एक नवीन फ्लॅट देण्यात आला. तथापि नवीन फ्लॅटसाठी भरण्यात आलेले स्टॅम्प ड्युटी मूल्य, जे २५,१७,७०० रुपये होते आणि जुन्या फ्लॅटच्या अधिग्रहणाची अनुक्रमित किंमत, जी ५,४३,०४० रुपये मोजली गेली, यामध्ये १९,७४,६६० रुपयांचा फरक होता. १९.७४ लाख रुपयांचा हा फरक "इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न" म्हणून वर्गीकृत करण्यात आला आणि म्हणूनच, हा व्यवहार कर निर्धारण अधिकारी आणि त्यानंतर आयकर आयुक्त (अपील) यांनी करपात्र ठरवला.
तथापि, जेव्हा या प्रकरणाची सुनावणी मा. आयकर लवादा समोर झाली तेव्हा घरमालकाला अनुकूल आदेश मिळाला.मा. लवादाच्या मते च्या मते, आयकर कायदा कलम 56(2)(x) मधील तरतुदी सध्याच्या प्रकरणातील तथ्यांना लागू होणार नाहीत. जास्तीत जास्त, या व्यवहारात भांडवली नफ्याशी संबंधित तरतुदी लागू होऊ शकतात, अशा परिस्थितीत, करदात्याला कायद्याच्या कलम 54 अंतर्गत नवीन फ्लॅटच्या किमतीतून वजावट मिळण्याचा अधिकार असावा. अशा परिस्थितीत, या व्यवहारांमुळे करदात्यावर कोणतेही कर दायित्व राहणार नाही."
आयकर तज्ञांच्या मते “कर विभागाने लावलेला कायद्याचा अर्थ लावण्यात चुकीचा होता, कारण कलम ५६(२)(x) हा भेटवस्तूंसाठी आहे आणि पुनर्विकास प्रकल्पांच्या बाबतीत, जुन्या फ्लॅट मालकाला तो नवीन फ्लॅट मोफत भेट म्हणून मिळत नाही, तर तो जुन्या फ्लॅटच्या बदल्यात मिळतो, जो परत केला गेला आहे.
या निकालाने स्पष्ट केले आहे की हा व्यवहार भेट म्हणून मानला जाणार नाही, आणि म्हणूनच, "इतर स्रोतांमधून उत्पन्न" या शीर्षकाखाली कर आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.मा.लवादाने आदेशात नमूद केले आहे की या व्यवहारावर भांडवली नफा या शीर्षकाखाली कर आकारला जाऊ शकतो. निवासी घर भांडवली नफा विक्रीच्या बाबतीत, करदात्यांनी भांडवली नफ्याच्या रकमेतून दुसरे खरेदी/बांधकाम केल्यास त्यांना कलम ५४ ची सूट मिळू शकते.