22 सप्टेंबर पासून लोणी, तूप, चीज, बदाम, बिस्किट, टूथपेस्ट, दूध पावडर, ए. सी., सोलर कुकर आदी वस्तूंवर दर कपात लागू करण्यात आली. सरकारनेही ग्राहकांना या कपातीचा फायदा न देणाऱ्या व्यावसायिकांची माहिती देण्याचे कळवले आहे. केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी तसेच ग्राहक व्यवहार विभाग यांनी यासाठी पावले उचलली आहेत तरीही काही व्यावसायिक ग्राहकांना याचा फायदा देताना दिसत नाहीत.
'जीएसटी' कमी न करताच वस्तूंची विक्री, ग्राहकांना लाभ द्यायची टाळाटाळ; "या" जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
October 24, 2025
जीएसटी परिषदेच्या निर्णयानुसार सरकारने अलीकडेच काही जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) दरात कपात केली आहे. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी जुन्याच किमतीत वस्तूंची विक्री सुरू ठेवली आहे. सर्वसामान्य ग्राहक यांना याचा फायदा होताना दिसत नाही. जुना स्टॉक असलेल्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल होत असून, त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे चित्र आहे. ऐन दिवाळी सणाच्या धामधुमीत असे प्रकार घडले असल्याबाबत अनेक तक्रारी ग्राहक संरक्षण परिषदेकडे आल्या आहेत. त्यावर मंगळवारी (ता. २८ ऑक्टोबर) ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष तथा कोल्हापूर चे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून चर्चा होणार आहे.