ग्राहकांना जीएसटी सुधारणांचा फायदा हा वस्तूंच्या किमती कमी झाल्याने मिळत आहे.तरीही २२ सप्टेंबर रोजी कमी जीएसटी दर लागू झाल्यापासून सरकार देशभरातील ५४ वस्तूंच्या किमतींवर लक्ष ठेवून असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
जीएसटी दरांमध्ये कपात केल्यामुळे खरेदी वाढली आहे. वाढत्या वापराचा कल कायम राहील अशी अपेक्षा आहे. मोठ्या प्रमाणावर कंपन्या वस्तूवर ग्राहकांना फायदा देत आहेत. काही वस्तूंच्या बाबतीत व्यवसायांनी जीएसटी दरकपातीचे अधिक फायदे ग्राहकांना दिले आहेत, असे मा.अर्थमंत्र्यांनी सांगितले. तरीही जीएसटी कपातीनुसार किमती कमी न केल्याबद्दल ग्राहक व्यवहार विभागाला हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ३,०७५ तक्रारी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या नोडल अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्या आहेत. विभागाने शेकडो तक्रारींचे निराकरण केले आहे. ज्या भागातून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्या भागातील मुख्य आयुक्तांकडे तक्रारी पाठवण्याची सुविधा विभाग तक्रार पोर्टलवर उपलब्ध होत आहे, असे मा. अर्थमंत्र्यांनी सांगितले.
गेल्या नवरात्रीच्या तुलनेत यंदा २०-२५ टक्के विक्री जास्त होती आणि मोठ्या टीव्ही सारख्या अनेक श्रेणीच्या वस्तूंच्या साठ्याची पूर्णपणे विक्री झाली असल्याचे सर्व रिटेल साखळ्यांमधील आकडेवारीवरून दिसून येते, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री मा.अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या वाढत्या मागणीचा थेट परिणाम इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आता दुहेरी अंकी वार्षिक वाढीच्या दराने वाढत आहे.