तीन पत्ती मास्टर ॲप कंपनीला ३६ कोटी रुपयांची जीएसटी मागणीची नोटीस -१९ कोटी गोठवले - डीजीजीआय, कोल्हापूर विभागाची मोठी कारवाई

GST 4 YOU
ऑनलाइन मनी गेमिंग सेवा पुरवणाऱ्या तीन पत्ती मास्टर ॲपला वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाच्या (DGGI ) कोल्हापूर प्रादेशिक विभागाने चांगलाच दणका दिला आहे. कंपनीची देशभरातील विविध बँकांमध्ये असणारी १९ कोटी रुपयांची रक्कम गोठवत कंपनीला ३६ कोटी रुपयांची जीएसटी मागणीची नोटीस बजाविली. सिंगापूरस्थित हि कंपनी नोंदणीकृत नसून ४० टक्के जीएसटीची चुकवेगिरी केल्याचे जीएसटी विभागाच्या तपासात स्पष्ट झाले.
       तीन पत्ती मास्टर हे सिंगापूरस्थित लिटा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी संबंधित ऑनलाइन मनी गेमिंग ॲप आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या अवघ्या तीन महिन्यांच्या काळात कंपनीच्या खात्यावर सुमारे ९० कोटींचे क्रेडीट झाले आहे. यूपीआय आयडीपासून ते बँक खात्यांपर्यंतचा तपास यंत्रणेने केला. तत्कालीन वरिष्ठ गुप्तचर अधिकारी अभिजीत भिसे, आशुतोष कुमार आणि गुप्तचर अधिकारी अतुल कुमार जैस्वाल यांच्या पथकाने हा तपास केला, परदेशस्थित ऑनलाइन मनी गेमिंग कंपनीविरोधात जीएसटी कायद्यानुसार केलेली ही पहिलीच कारवाई आहे.
      तीन पत्ती ॲप केवळ प्ले स्टोअरवरुन डाउनलोड केले जाते. यावर तीन-पत्ती, अंदर बाहर, ए के ४७, जॅकपॉट, कार रोलेट, ७ अप डाऊन आणि सॉकर रोलेट यांसारखे विविध ऑनलाइन गेम उपलब्ध होते. खेळणाऱ्याला खरे पैसे जमा करून गेम खेळण्याची आणि निकालानुसार पैसे जिंकण्याची सुविधा होती. अधिकाऱ्यांनी यात खेळाडू म्हणून भाग घेऊन या गेमिंग कंपनीची मोडस ऑपरेंडी माहीत करून घेतली व ही कारवाई केली