जीएसटी कार्यालयातील जप्त केलेला स्क्रॅप लिलावाादरे मिळवून देतो, असे आमिष दाखवून ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रसूल शेख या कोल्हापूर येथील जीएसटी कर्मचाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तौफिक खान यांनी शिवाजीनगर, इचलकरंंजी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कोल्हापूर राज्य जीएसटी कार्यालयातील शिपाई रसूल बाबू शेख (वय ५२, रा. बावडा, ता. करवीर) याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्याला मा.न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रसूल शेख आणि शोएब सलीम अथणीकर (रा. कुरूंदवाड, ता. शिरोळ) हे दोघेजण इचलकरंजीतील स्क्रॅप व्यावसायिक तौफिक खान यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेले असता शोएब अथणीकर याने रसूल शेख हा कोल्हापुरातील जीएसटी कार्यालयात अधिकारी असल्याचे सांगितले. त्यावेळी रसूल शेख याने जीएसटी न भरलेल्या कंपनीतील जप्त मशीनरीची विक्री निविदा द्यायची आहे. त्यासाठी इच्छुक असाल, तर ते मी मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यावेळी शोएब अथणीकर यानेही निविदे साठी ऑनलाइन रक्कम भरायची असल्याचे सांगितले.
सदर स्क्रॅपची किंमत सुमारे दीड कोटी असून, त्याच्या निविदेची रक्कम ५५ लाख पैकी सुरुवातीला ५० टक्के रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार ३० मार्च २०२२ ते ९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बँकेतून आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे तौफिक खान यांनी ४५ लाख रुपये भरले. परंतु, निविदा निघाली नाही. याबाबत कोल्हापुरातील राज्य जीएसटी कार्यालयात जाऊन अधिक विचारणा केली असता रसूल शेख हा तेथे शिपाई असल्याचे व त्याने अनेकांना असे स्क्रॅपचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समजले. त्यामुळे तौफिक खान यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात घेताच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत रसूल शेख याच्याविरोधात तक्रार दिली. अधिक तपास सुरू आहे.