रत्नागिरी तील चिपळूण तालुक्यातील दहिवली परिसरातील एका कात उद्योजकावर केंद्र सरकारच्या जीएसटी पथकाने छापेमारी केल्याची बातमी पुढे आल्याने चिपळूण तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. कात व्यावसायिकांवर मागील महिन्यात ईडी कडून छापे टाकण्याचे वृत्त याच्या पाठोपाठ आता केंद्रीय जीएसटी पथकाकडून कारवाई झाल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा रस्त्यावर सावर्डे येथे असणाऱ्या कात कारखान्यावर ईडीने कारवाई करून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. तर आता जीएसटीच्या पथकाने दहिवली येथील कात उद्योजकाची चौकशी सुरू केली आहे. भल्या पहाटे जीएसटीचे पथकाने कारखान्यावर व घरात एका वेळी छापा टाकून कागदपत्रांची चौकशी सुरू केली.
सायंकाळी उशिरापर्यंत जीएसटी विभागाचे अधिकारी, कर्मचारी कागद पत्रे, साठा याची छाननी करत होते. कातासाठी बेकायदेशीर लाकूडतोड, त्याची वाहतूक यामुळे आधीपासूनच कात उद्योजक विविध विभाग जसे वन विभाग तसेच प्राप्तिकर व ईडीच्या रडारवर आहेत. मात्र, दहिवली येथील कात उद्योजकावर नेमक्या कोणत्या कारणासाठी हा छापा टाकला, याची अधिकृत माहिती मिळाली नाही.