आयकर अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाचे आणि त्याच्या पत्नीचे अपहरण करून त्याच्या अंधेरी पूर्व येथील कार्यालयात बनावट छापा टाकून प्रकरण 'मिटवण्यासाठी' १ कोटी रुपयांची मागणी या आरोपाखाली अंधेरी पोलिसांनी मुंबई आणि पुण्यातून तीन महिलांसह एकूण दहा जणांना अटक केली होती. आयकर विभागातील निरीक्षक व कर सहायक यांचा ही आरोपीत समावेश आहे.
सहार कार्गो इस्टेटमधील टू एम ऑप्थोट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक राजकुमार कंडसामी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब उघडकीस आली होती. कंडसामी यांनी पोलिसांना सांगितले की काही दिवसांपूर्वी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना फोन करून सांगितले की आयकर अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. त्यानंतर लगेचच, त्यांना थेट धमकीचा फोन आला. साध्या वेशातील दोन व्यक्तींनी कंडसामी आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या निवासस्थानाजवळ गाठले. त्यांनी स्वतःला आयकर अधिकारी असल्याचे भासवले, ओळखपत्र दाखवले आणि त्या जोडप्याला जबरदस्तीने टॅक्सीत बसवले. ते त्यांना कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले, जिथे त्यांचे साथीदार आधीच जमले होते. कंदसामी, त्यांची पत्नी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त केले, त्यांच्या हालचालींवर निर्बंध घातले, कर्मचाऱ्यांची चौकशी केली आणि कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी केली. आरोपींपैकी एकाने कथितरित्या एक बनावट शोध वॉरंट दाखवून कंदसामी यांची सही घेतली. त्यानंतर त्या गटाने त्यांना मोठ्या दंडाची धमकी दिली आणि १ कोटी रुपयांमध्ये प्रकरण मिटवण्याचा प्रस्ताव ठेवला. हा बनावट छापा तीन तासांपेक्षा जास्त काळ चालला आणि रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी निघून गेले.
पोलिसांनी सांगितले की, ही कारवाई अक्षय कुमार यांच्या 'स्पेशल २६' या चित्रपटाच्या कथानकासारखी होती, ज्यामध्ये ठग अंमलबजावणी अधिकारी असल्याचे भासवून बनावट छापे टाकल्याचे दाखवले आहे.
अंधेरी पोलीस पथकाने सरकारी आणि खाजगी कॅमेऱ्यांमधील कॉल रेकॉर्ड, मोबाईल नंबर, डंप डेटा, लोकेशन तपशील आणि सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. संतोष उदय खोपटकर , विनय रमेश मोरे ,प्रेम किसन सबनानी, प्रज्ञा हरीश माईन , रेश्मा शामराव वारंग , सबीना हाफीज शेख तसेच आयकर विभागातील सुरेश महावीरप्रसाद मिश्रा (आयकर निरीक्षक), सुनिल मनोहर गोरे (कर सहायक) आदीसह आणखी दोन आरोपीना अटक केली होती.