जीएसटी कर सल्लागाराकडून करदात्याची ५८ लाखांची फसवणूक- स्वतःचा मेल आयडी जोडून केले बोगस व्यवहार

GST 4 YOU
.            इतरांची बिले दुसऱ्याच्या फर्मच्या जीएसटी खात्यावर अपलोड करून ५८ लाख ८१ हजारांचा गंडा घातल्याबद्दल कर सल्लागार तुषार पाटील (वय २९, रा. बामणी, ता. कागल) याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडला. याबाबत दत्त समर्थ सर्व्हिसेस फर्मचे प्रमुख शैलेश सुभाष जाधव , कोल्हापूर यांनी सोमवारी (दि. २) फियांद दिली आहे.
           सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांची दत्त समर्थ सर्व्हिसेस फर्म आहे. या फर्मकडून विविध कंपनीच्या वस्तूंची विक्री केली जाते. एप्रिल २०२३ पासून तुषार पाटील हा फर्मचा कर सल्लागार म्हणून काम करीत होता. त्याने विश्वास संपादन करून जाधव यांच्याकडून फर्मच्या जीएसटी खात्याची माहिती घेतली. पासवर्ड बदलून त्याला स्वतःचा मेल आयडी जोडला. एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या काळात तुषार पाटील याने २ कोटी १५ लाख ४ हजार ७१३ रुपयांची विक्रीची बिले फर्मच्या जीएसटी खात्यावर अपलोड केली. त्यानुसार जीएसटी कार्यालयाकडून जाधव यांना ५८ लाख ८१ हजार ५०३ रुपये जीएसटी भरण्याची नोटीस आली. जीएसटी भरण्याची नोटीस येताच फर्मचे मालक जाधव यांनी जीएसटी कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी कर सल्लागार पाटील याने दत्त समर्थ सर्व्हिसेस फर्मच्या खात्यावर विक्रीची दुसरीच बिले अपलोड केल्याचे लक्षात आले. त्याने ५८ लाख ८१ हजारांचा अपहार केल्याचे स्पष्ट होताच जाधव यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करीत आहे.
           यापूर्वीही विश्वासाचा गैरफायदा घेत,एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापुरात एक कर सल्लागार व त्याची पत्नी  यांच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी सदर सल्लागार याला पोलिसांनी अटक केली होती .
          कर दात्यांनी आपल्या जीएसटी संबंधी व्यवहारासाठी जागरूक राहण्याची गरज असून जीएसटी खात्यात होणार्या व्यवहाराची अद्ययावत माहिती असणे आवशयक असून जीएसटी खात्याशी शक्य तो वर स्वताचा मेल व मोबाईल क्रर्मांक संलग्न केल्यास अशा बोगस व्यकीकडून होणारी फसवणूक टाळता येईल.