नवीन आयकर कायदा सुटसुटीत - कर वसुलीसाठी होणार एआयचा वापर- प्रधान मुख्य आयुक्त विवेक वाडेकर- 'प्रारंभ २०२६' अभियानाची खा.मेधा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात

GST 4 YOU
पुणे -प्राप्तिकर २०२५ हा नवा कायदा अधिक सुटसुटीत अन् सोप्या भाषेत केल्याने सर्वांना तो समजेल. तसेच प्राप्तिकर वसुलीसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणार असून, चॅटबॉट मुळे आता पाहिजे ती माहिती मिळणार असे मत आयकर प्रधान मुख्य आयुक्त विवेक वाडेकर यांनी व्यक्त केले. ते पुण्यात झालेल्या प्रारंभ २०२६ या राज्यातील अभियानाच्या सुरुवाती निमित्ताने झालेल्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी खा. डॉ. मेधा कुलकर्णी, उद्योजिका लीला पूनावाला, प्रदीप भार्गव आदी प्रमुख उपस्थित होते. कॉसमॉस बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्राप्तिकर विभागाच्या वतीने नव्या आयकर कायद्याविषयीची माहिती देण्यात आली. 
       . गेल्या अनेक दशकांतील असंख्य सुधारणांमुळे जुना कायदा प्रदीर्घ आणि गुंतागुंतीचा झाला होता, परिणामी अनुपालनाचा बोजा आणि त्याचा अर्थ लावण्याबाबतच्या समस्या वाढल्या होत्या, असे त्यांनी नमूद केले.ही नवीन कर पद्धती खटले कमी करणे, करदात्यांची सोय आणि त्यांचा विश्वास वाढवणे, अनुपालन खर्च आणि वेळ कमी करणे, तसेच आधुनिक, डिजिटल-सक्षम आणि विश्वासावर आधारित प्रशासनाच्या माध्यमातून 'ईझ ऑफ डुइंग बिझनेस', म्हणजेच व्यवसाय सुलभतेला समर्थन देण्याचे कार्य करेल. 
या वेळी बोलताना खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आधुनिक लोकशाही आणि विकसित भारतासाठी सोपी आणि पारदर्शक करप्रणाली आवश्यक आहे, असे मत  व्यक्त केले. साधेपणा, स्पष्टता आणि 'नागरिक देवो भव' ही भावना रुजवणाऱ्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाबद्दल त्यांनी विभागाचे अभिनंदन केले. अधिक सुलभ कायदे, विशेषतः प्रामाणिक करदाते, मध्यमवर्गीय कुटुंबे, स्टार्टअप्स, एमएसएमई,  महिला उद्योजक आणि तरुण व्यावसायिकांवरील अनुपालनाचा बोजा कमी करतात. या सुधारणांमधून भारत सरकारचा डिजिटल इंडिया, व्यवसाय सुलभता आणि 2047 पर्यंत विकसित भारत हा व्यापक दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो, असे त्या म्हणाल्या.
    आयकर विभागाच्या वतीने या मेगा इव्हेंटनंतर संपूर्ण राज्यभर व्यापक संपर्क कार्यक्रम आयोजित केले जातील. पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, ठाणे, बीड, नांदेड, सोलापूर, नाशिक, पुणे  आदी जिल्ह्यांमध्ये व्यापक संपर्क मोहीम राबवण्याचे प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले..