लोक नेते यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून सहकाराला दिशा मिळाली आणि ही चळवळ ग्रामीण विकासाचे 'ग्रोथ इंजिन' ठरली. येत्या काळात सहकार क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी ताकद ठरणार असून, सनदी लेखापालांनी आर्थिक व्यवस्थापनाची प्रभावी जोड देऊन सहकार अधिक सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे,' असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (डब्ल्यूआयआरसी); तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी आणि लातूर शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'सहकार पर्व राज्यस्तरीय सहकार परिषद'चे उद्घाटन शनिवारी झाले. या वेळी प्रभू दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.
'आयसीएआय'च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य अभिषेक धामणे, राजेश अग्रवाल, डॉ. यशवंत कासार, 'आयसीएआय' पुणे शाखेचे अध्यक्ष प्रणव आपटे, उपाध्यक्ष नीलेश येवलेकर, सचिव नेहा फडके यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
प्रभू म्हणाले, 'यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सहकार चळवळीला बळ दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करून या क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यामुळे देशभरात सहकार क्षेत्राचा विस्तार होत असून, भविष्यात ते अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देईल.' धामणे यांनी परिषदेची माहिती
चंद्रशेखर चितळे म्हणाले, 'सहकारातून 'समृद्धीकडे' या ध्येयाने सरकार काम करीत असून, नव्या सहकार धोरणामुळे व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. भागधारकांना लाभ मिळण्याबरोबरच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. या प्रक्रियेत सनदी लेखापालांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.'