केंद्रीय जीएसटी, कोल्हापूर च्या ‘सहज कर संवाद’ उपक्रमाचा उत्साहात प्रारंभ ;सीजीएसटी आयुक्त सुमित कुमार यादव यांच्या हस्ते प्रारंभ; जीएसटी जनजागृतीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन

GST 4 YOU
जीएसटीविषयी जनजागृती करणे, करदात्यांना नवीन कर सुधारणा व तरतुदींची माहिती उपलब्ध करून देणे तसेच कर प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करणे या उद्देशाने केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी), कोल्हापूर आयुक्तालयाच्या वतीने दि. २६ व २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय विशेष  जनसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘पहल – एक कदम, संवाद से उन्नति की ओर’ या व्यापक उपक्रमांतर्गत ‘सहज कर संवाद’ या संकल्पनेवर आधारित हे अभियान राबविण्यात आले.
    या अभियानाचा शुभारंभ  २६ नोव्हेंबर ला सीजीएसटी कोल्हापूरचे आयुक्त सुमित कुमार यादव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीकांत अवचार, संयुक्त आयुक्त रोहित जोशी, संयुक्त आयुक्त अक्षय पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. या अभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील साने गुरुजी वसाहत, राजारामपुरी, गांधीनगर, सदर बाजार, नागाळा पार्क आणि शाहूपुरी या सहा प्रमुख ठिकाणी विशेष जीएसटी जनजागृती कॅनोपी उभारण्यात आल्या. या ठिकाणी नागरिक, व्यापारी, जीएसटी नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. माहितीपत्रकांचे वितरण करून जीएसटीविषयक विविध तरतुदी, प्रक्रिया व अलीकडील सुधारणांची माहिती देण्यात आली.
या अभियानाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे डिजिटल डिस्प्ले प्रणालीने सुसज्ज असलेले विशेष मोबाइल प्रचार वाहन ‘जीएसटी वाहिनी’ हे होते. या वाहनाच्या माध्यमातून  शहरातील विविध भागांमध्ये जीएसटीविषयक माहितीचा प्रसार करण्यात आला. जीएसटीमधील अलीकडील सुधारणा, नोंदणी प्रक्रिया, वैधानिक तरतुदी आणि अनुपालनविषयक माहिती डिजिटल माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच बनावट बिले तयार करणे, फसवणुकीने इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करणे अथवा त्याचे बेकायदेशीर हस्तांतरण करणे यांसारख्या गैरप्रकारांचे दुष्परिणाम स्पष्ट करून नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्क करण्यात आले.
या जनजागृती अभियानाला विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथील वाणिज्य शाखेच्या निवडक ३० विद्यार्थी स्वयंसेवकांनी ‘जीएसटी मित्र’ म्हणून उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विशेष योगदान दिले. या विद्यार्थ्यांनी जीएसटी अधिकाऱ्यांसमवेत विविध जनजागृती केंद्रांवर माहितीपत्रकांचे वितरण, नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद तसेच जीएसटीमधील अलीकडील सुधारणा व प्रक्रियांबाबत माहिती प्रसारित करण्याचे काम केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जीएसटी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची, जीएसटी प्रशासनाची कार्यपद्धती समजून घेण्याची आणि करप्रणालीविषयी व्यावहारिक ज्ञान मिळविण्याची संधी उपलब्ध झाली. .
‘सहज कर संवाद’ या उपक्रमाची पुढील पायरी म्हणून सीजीएसटी कोल्हापूर आयुक्तालयाच्या वतीने दि. ३ डिसेंबर  रोजी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या समन्वयाने विशेष जनसंपर्क व संवाद कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात ५७ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि करण्यात आलेल्या शिफारशी यावर व्यापारी, उद्योजक, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी व इतर संबंधित घटकांसोबत सविस्तर आणि संवादात्मक चर्चा करण्यात येणार आहे.