जीएसटी वसुलीसाठी स्थावर मालमत्ता जप्त -राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून धडक कारवाई - थकबाकी दारांना दिला इशारा

GST 4 YOU
          एक कोटी एक्क्यांशी लाख रुपयांच्या थकीत जीएसटी वसुलीसाठी गंगापूर येथील एका  जीएसटी कर दात्याची स्थावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून करण्यात आली आहे. या व्यापाऱ्यास वारंवार नोटीस बजावूनही टाळाटाळ केल्याने अखेर जप्तीची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
      आर्थिक वर्ष अखेर जवळ येत असताना आता राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून थकीत जीएसटी कर वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी थकीत कर वसुलीसाठी कन्नड येथील एका व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त केली होती. आता अशी वसुली ची कारवाई राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून ता. गंगापूर, छत्रपती संभाजीनगर येथील एका व्यापाऱ्यावर करण्यात आली आहे.
व्यापाऱ्याकडे १.८१ कोटी हून अधिक बाकी प्रलंबित होती. वारंवार नोटीस बजावूनही कराचा भरणा करण्यात आला नव्हता. त्यामुळे अखेर विभागाने साडेसहा एकर जमीन जप्तीची कारवाई केली.
     राज्य जीएसटी विभागाचे सह आयुक्त अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्य कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.