केंद्रीय जीएसटी गुप्तचर महासंचलनालयाच्या (डीजीजीआय), पुणे विभागीय कार्यालयाने मोठा जीएसटी घोटाळा उघड केला असून या सुमारे ५ हजार कोटींच्या कर चुकवेगिरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गुजरातमधील असल्याचे तपासात उघडकीस आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आठजणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीएसटीच्या तपास पथकाने पुणे, मुंबई, तसेच गुजरातमधील राजकोट, भावनगर परिसरात कारवाई केली. पठाण एंटरप्रायजेस आणि इतर बनावट नावाने अश्रफभाई कालावाडिया हे रॅकेट चालवित असल्याची माहिती तपासात मिळाली. पथकाने मीरा भाईंदर परिसरातील एका लॉजमधून कालावाडिया ताब्यात घेतले. त्याच्याकडून २१ मोबाइल संच, दोन लॅपटॉप, ११ सीमकार्ड, डेबिट कार्ड, धनादेश पुस्तिका, वेगवेगळ्या कंपनीच्या नावे रबरी शिक्के जप्त करण्यात आले.
कालवाडियाला अटक करुन पुण्यातील शिवाजीनगर न्यायालायत हजर करण्यात आले. न्यायालायाने त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
जीएसटी कर चुकवेगिरीसाठी आरोपी कालावाडियाने साथीदार नितीन बर्गे, फैजल् मेवावाला, अमित सिंग, जितेंद्र गोहेल, कौरि मकवाना, राहुल बरैय्या आणि साथीदारांनी कट रचला. जीएसटी कर चुकविण्यासाठी त्यांनी बनावट नावाने २४६ कंपन्या स्थापन केल्या. ज्यांना कर चुकवायाचा आहे,अशा व्यावसायिकांकडून पैसे घेऊन आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे कर चुकवेगिरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सप्टेंबर २०१८ पासून मार्च २०२४ पर्यंत आरोपींनी शासनाची पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चुकविल्याचे सूत्रांकडून समजते.