गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्री गटाने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नावर विश्लेषणात्मक चर्चा केली. मंत्र्यांच्या गटाची पहिली बैठक शुक्रवारी नवीन महाराष्ट्र सदनात पार पडली.
महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे सह छत्तीसगड व पंजाबचे अर्थमंत्री आणि नऊ राज्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दोन राज्यांचे प्रतिनिधी आभासी पद्धतीने सहभागी झाले. आंध्र प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा यांनी आपले सविस्तर सादरीकरण सादर केले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले,ही बैठक जीएसटी धोरणांना स्पष्ट दिशा देण्यासाठी आणि केंद्र, राज्य यांच्यातील आर्थिक समन्वय बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे. अदिती तटकरे म्हणाल्या की, जीएसटी, आयजीएसटी आणि एसजीएसटी उत्पन्नासंबंधी पहिलीच बैठक होती. यापूर्वी मंत्र्यांच्या गटाच्या विविध मुद्द्यांवर बैठका झाल्या असल्या, तरी जीएसटी उत्पन्नावर केंद्रित अशी ही पहिली बैठक होय.
यावेळी चर्चा केलेले प्रमुख मुद्दे:
*जीएसटीपूर्वीच्या आणि नंतरच्या महसूल प्रवाहाचे तुलनात्मक विश्लेषण,
*क्षेत्र-विशिष्ट कर गळती आणि सुधारात्मक उपाययोजना
*अनुपालन अंमलबजावणी साधनांच्या कामगिरीचे मूल्यांकन
*चांगल्या ट्रेसेबिलिटीसाठी ई-इनव्हॉइसिंग आणि आयटी सिस्टम सुधारणा
*महसूल वाढवण्यासाठी राज्य-विशिष्ट धोरण सूचना,
*केंद्र आणि राज्य कर प्रशासनांमधील समन्वय
यावेळी भारताच्या वित्तीय परिसंस्थेला बळकटी देणारी आणि 'एक राष्ट्र, एक कर' च्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारी एक मजबूत आणि समान जीएसटी चौकट सुनिश्चित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे असेही पुढे प्रमोद सावंत यांनी सांगितलं.