आता बड्या विमा कंपनीला जीएसटीची रु.2298 कोटींची मागणी नोटीस - मात्र विभागाच्या दाव्याशी कंपनी असहमत

GST 4 YOU
.        सार्वजनिक क्षेत्रातील बडी विमा कंपनी  न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड ला जीएसटी  अधिकाऱ्यांनी  एप्रिल २०१८ ते मार्च २०२३ या कालावधीसाठी २,२९८.०६ कोटी करांची मागणी करणारी कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
          विमा कंपनीच्या २६ जून रोजीच्या नियामक फाइलिंगनुसार, अतिरिक्त आयुक्त, जीएसटी, मुंबई दक्षिण यांच्या कार्यालयाने ही नोटीस बजावली आहे. त्यात  जीएसटी कायद्याच्या कलम ७४ आणि १२३ अंतर्गत कथित अनियमितता नमूद केल्या असून, ज्यामध्ये कराचा भरणा न करणे किंवा कमी भरणा करणे, इनपुट टॅक्स क्रेडिटचा चुकीचा दावा करणे आणि विहित वेळेत माहिती, रिटर्न सादर न करणे यांचा समावेश आहे.
    या नोटीसीत अधिकाऱ्यांनी असा आरोप केला आहे की विविध विसंगतींमध्ये फसवणूक, जाणूनबुजून चुकीचे विधान करणे किंवा तथ्ये दडपणे यासारख्या घटकांचा समावेश असू शकतो, जीएसटी कायद्याच्या कलम ७४(७) अंतर्गत समाविष्ट असलेल्या या बाबी आहेत.
     न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सने स्पष्ट केले की या नोटीसीचा त्यांच्या व्यवसाय ,ऑपरेशन्स किंवा आर्थिक स्थितीवर परिणाम होत नाही. कंपनीने असेही म्हटले आहे की ते सर्व लागू कायद्यांचे पालन करत आहे आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर उपायां द्वारे नोटिसीला उत्तर देण्यात येईल.
    2018- 19 या आर्थिक वर्षासाठीच्या कारणे दाखवा सूचना देण्याची मुदत 30 जून 2025 रोजी संपत असल्याने आता अशा नोटीसींचा चा महापूर आल्याचे दिसून येत आहे.