कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढणारा प्रभाव यामुळे सीए' अभ्यासक्रमात आता 'एआय'चा समावेश- आयसीएआयचे अध्यक्ष चरणज्योतसिंग नंदा- पुण्यात आयसीएआयतर्फे आयोजित 'एआय इनोव्हेशन समीट २०२५

GST 4 YOU

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) सर्व क्षेत्रात झपाट्याने वाढणारा प्रभाव लक्षात घेता इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमात एआयचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे २०२७ नंतर तयार होणारे सीए 'एआय प्रशिक्षित' असतील,' असे प्रतिपादन आयसीएआयचे अध्यक्ष चरणज्योतसिंग नंदा यांनी दिली.ते पुण्यात आयसीएआयतर्फे आयोजित 'एआय इनोव्हेशन समीट २०२५' या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आयसीएआयचे उपाध्यक्ष प्रसन्नकुमार डी., सचिव डॉ. जयकुमार बत्रा, पुणे शाखाध्यक्ष सचिन मिणियार, एआय समितीचे अध्यक्ष उमेश शर्मा, 'डब्ल्यूआयआरसी'चे अध्यक्ष  केतन सैय्या,  उमेश शर्मा व  दयानिवास शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
    नंदा पुढे म्हणाले शिष्यवृत्ती निधीमध्ये आयसीएआयने मोठी वाढ करत ती रक्कम १०० कोटींहून ५०० कोटी रुपयांपर्यंत नेली आहे. ही शिष्यवृत्ती गुणवंत गरजू आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी आहे.  
       नंदा म्हणाले, की आयसीएआयअंतर्गत यासाठी स्वतंत्र एआय समिती स्थापन करण्यात आली असून, आतापर्यंत ५०० हून अधिक प्रशिक्षण वर्गांमधून २५,००० हून अधिक नोंदणीकृत सीएंना एआय प्रशिक्षण देण्यात आले आहे. आगामी काळात सनदी लेखापालांना केवळ पारंपरिक लेखापरीक्षण नव्हे, तर डेटा अॅनालिटिक्स, ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपाययोजनांमध्येही निपुणता आवश्यक आहे. याशिवाय आयसीएआयने हैदराबादसह देशभरात नऊ संशोधन केंद्रे सुरू केली जात आहेत. पुण्यात एक विशेष केंद्राची निर्मिती होणार आहे.
प्रसन्नकुमार म्हणाले, की एआय हा आपल्या व्यवसायाचा अविभाज्य भाग बनला असून, 'एआय' आत्मसात केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. लाखो सनदी लेखापाल आणि सीए विद्यार्थी हे नवे तंत्रज्ञान वापरत आहेत. त्याचा आणखी प्रभावी वापर कसा करता येईल. आयटीतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर व ओपनएआय सोर्सच्या पब्लिक पॉलिसी अँड पार्टनरशिप हेड प्रज्ञा मिश्रा यांचे 'एआय' वर बीजभाषण झाले. १००० हून अधिक सनदी लेखापाल उपस्थित होते.नेहा फडके व प्रज्ञा बंब यांनी सूत्रसंचालन केले.