स्वातंत्र्य दिवस समारंभात बोलताना जीएसटीच्या दरात कपात करण्याचे सूतोवाच अलीकडेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आज बुधवारी आणि उद्या गुरुवारी ( २० व २१ ऑगस्ट) राज्यांच्या मंत्री समूहाची बैठक होत असून मा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मार्गदर्शन करणार असल्याने बैठकीकडे अर्थ जगताचे लक्ष लागले. सध्या जीएसटीचे चार टप्पे आहेत. हे टप्पे दोनपर्यंत कमी करण्याचा विचार सरकार करीत आहे अशा बातम्या समोर येत आहेत. जीएसटी कराचे सुसूत्रीकरण केले जाईल, असे मागील काही काळापासून सरकार सांगत आहे. दिवाळीपर्यंत कराचे प्रमाण कमी केले जाईल आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांना होईल, असे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. जीएसटी कराचे दोन टप्पे बनविले जाऊ शकतात. शिवाय काही ठराविक वस्तूंवर चाळीस टक्क्यांचा विशेष कर आकारला जाऊ शकतो. वरील बदल करीत असताना विद्यमान १२ आणि २८ टक्क्यांचा कराचा टप्पे हटवणे बद्दल विचार केला जाऊ शकतो. मंत्री समूहाच्या बैठकीत या कराचे टप्पे कमी करण्याच्या मुद्द्धावर विचारविनियम होणार असल्याचे समजते. बिहारचे मा. उपमुख्यमंत्री सप्नाट चौधरी हे सहा सदस्यीय मंत्रिसमुहाचे समन्वयक आहेत.