चार्टर्ड अकाउंटंट्सनी त्यांचे कौशल्य सतत अद्ययावत करावे - वरिष्ठ सीए यशवंत कासार - ९५० हून अधिक चार्टर्ड अकाउंटंट्सना पुण्यात औपचारिकपणे सीए पदवी प्रदान

GST 4 YOU
               चार्टर्ड अकाउंटंट्सनी त्यांचे कौशल्य सतत अद्ययावत करावे  असे प्रतिपादन कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष आणि वरिष्ठ सीए यशवंत कासार  यांनी केले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या पुणे शाखेने बाणेर येथील बंतारा भवन येथे आयोजित ९५० हून अधिक चार्टर्ड अकाउंटंट्सना पुण्यात  औपचारिकपणे सीए पदवी प्रदान कार्यक्रम प्रसंगी दीक्षांत समारंभात ते बोलत होते.आयसीएआयचे केंद्रीय परिषद सदस्य, सीए चंद्रशेखर चितळे, सीए उमेश शर्मा, प्रादेशिक परिषद सदस्य, सीए अभिषेक धामणे, सीए राजेश अग्रवाल, आयसीएआयच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिनियार आदी  मान्यवर  प्रमुख उपस्थित होते.
        यशवंत कासार  पुढे म्हणाले की, वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक वातावरणात प्रासंगिक राहण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्सनी त्यांचे कौशल्य सतत अपग्रेड केले पाहिजे आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंससारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. तंत्रज्ञान पूर्वीपेक्षाही वेगाने आपले पंख पसरवत आहे. समाजाच्या गरजांनुसार व्यवसाय अद्ययावत होत आहेत आणि आपणही तेच केले पाहिजे. सीएंसाठी, सर्वात मोठी ताकद म्हणजे विश्लेषणात्मक मानसिकता, परंतु आज उद्योगांना केवळ पात्रताच नव्हे तर सखोल विशेषज्ञता आणि समग्र व्यवसाय समज आवश्यक आहे . 
           कासार यांनी नवीन सी ए यांनी "नेहमी शिकणारे" राहण्याचे आवाहन केले. जिज्ञासा आणि स्वतःच्या  सोयी - गैरसोयी पलीकडे जाण्याची तयारी ठेवण्याची आवश्यकता वर्तवली.
     या वेळी  संबोधित करताना वरिष्ठ सीए शरद वझे म्हणाले, नूतन सीए अशा व्यवसायात प्रवेश करत आहेत, जो अत्यंत आदराला पात्र आहे,  परंतु त्याचबरोबर तो प्रचंड  जबाबदारी देखील घेऊन येतो. कठोर परिश्रम, नीतिमत्ता आणि सातत्य याशिवाय यश साध्य नाही असे सांगितले.
          पुणे शाखेचे उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए नीलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, समिती सदस्य सीए सारिका दिंडोकर, सीए प्रितेश मुनोत, सीए नंदकुमार कदम यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.