बोगस व्यवहार दाखवून केलेली 48 कोटींची जीएसटी चोरी उघड - जीएसटी विभागाकडून दोघांना अटक
December 25, 2025
खोटी बिले व बनावट व्यवहार करून जीएसटीची चोरी करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर राज्य जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. विभागाने केलेल्या कारवाईत ४८ कोटी ८ लाख रुपयांची करचोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. कर चोरी करणाऱ्या दोघांना विभागाने अटक केली. महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवाकर, अन्वेषण विभाग (रायगड नोडल १ ) च्या पथकाने ही कारवाई केली आहे. बोगमाल्लो एंटरप्रायझेस व मार्करीच अपेरल याकर नोंदणीकृत कंपनीच्या अभिजीत वझे व श्रेयस सावंत अशी संशयतांची नावे असून त्यांच्या कंपनीच्या कामकाजाची जीएसटी विभागाने तपासणी केली असता त्यांनी पुरवठादाराकडून प्रत्यक्षात कोणत्याही मालाचा पुरवठा न घेता आयटीसीचा लाभ मिळविल्याचे निदर्शनास आले. जीएसटी कर चोरीची ही रक्कम सुमारे ४८ कोटी वर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर वस्तु व सेवाकर कायदा २०१७ चे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास राज्य जीएसटी विभाग करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.