'जीएसटी संकलन मोठ्या प्रमाणात होत असून , कर आकारणीत त्यानुसार बदल केले आहेत. त्यामुळे लघू व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना व करदात्यांना दिलासा मिळाला आहे. त्याच वेळी इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये (आयटीसी) गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. या प्रकारांना आळा बसावा साठी चार्टर्ड अकाउंटंट यांनी भूमिका बजावावी ,' असे आवाहन 'केंद्रीय जीएसटी व सीमा शुल्क,' पुणे विभागाचे मुख्य आयुक्त मयांककुमार यांनी मंगळवारी केले.
'दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया'च्या (आयसीएआय) 'जीएसटी अँड
इन्डायरेक्ट टॅक्स कमिटी'च्या वतीने आणि 'आयसीएआय' पुणे शाखेच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मंगळवारी मयांककुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी 'जीएसटी कमिटी'चे उपाध्यक्ष उमेश शर्मा, केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य रेखा धामणकर, अभिषेक धामणे, राजेश अग्रवाल, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मणियार उपस्थित होते.
वस्तू व सेवा कर (जीएसटी) कौन्सिल वेळोवेळी आढावा घेऊन कायद्यात आवश्यक बदल करत आहे.जीएसटी' प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीत सनदी लेखापालांची (सीए) भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. सनदी लेखापालांना जीएसटी मध्ये घडणारे नवे बदल समजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदा उपयुक्त ठरतात,' असे मयांककुमार यांनी सांगितले. 'जीएसटी' सारख्या महत्त्वपूर्ण विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्याबद्दल 'आयसीएआय' पुणे शाखेचे अभिनंदन मयांककुमार यांनी केले.
सीए चंद्रशेखर चितळे यांनी यावेळी बोलताना सीए हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे आहेत. तसेच करदात्यांना चांगल्या पद्धतीने करभरणा करता यावा, यासाठी सीए परिश्रम घेतात. त्यांच्या अद्ययावत ज्ञानासाठी संस्थेमार्फत नियमितपणे विविध उपक्रम राबविण्यात येतात,' असे सांगितले. सीए उमेश शर्मा यावेळी म्हणाले, विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करून ही प्रणाली अधिक प्रभावी होण्यासाठी हे नवनवीन बदल जाणून घ्यायला हवेत, या उद्देशाने अशा परिषदांना अधिक महत्त्व आहे.