भारतीय महसूल सेवेतील अधिकारी श्रीमती विनू अजिंक्य काटकर यांना केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ,नवी दिल्ली यांचे वतीने विशेष सेवेबद्दलचा गौरव पुरस्कार जागतिक सीमाशुल्क दिनाच्या निमित्ताने विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.पंकज चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय महसूल सचिव मा.अरविंद श्रीवास्तव, केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाचे (सीबीआयसी) अध्यक्ष मा. विवेक चतुर्वेदी , तसेच सीबीआयसीचे सदस्य विशेष उपस्थित होते.
२०१७ च्या भारतीय महसूल सेवेच्या अधिकारी असलेल्या श्रीमती विनू अजिंक्य काटकर सध्या महसूल गुप्तचर विभाग,मुंबई येथे उप संचालक म्हणून कार्यरत आहेत. महसूल गुप्तचर विभागात काम करताना श्रीमती काटकर यांनी सार्वजनिक सुरक्षा, पर्यावरण आणि राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या प्रतिबंधित आणि चुकीच्या पद्धतीने घोषित केलेल्या आयाती रोखण्यासाठी गुप्त माहिती वर आधारित अंमलबजावणीमध्ये सहभाग घेतला .त्यांनी सुमारे ४० कोटी किमतीचे १०० टन प्रतिबंधित फटाके आणि २३ कोटी किमतीचा धोकादायक ई-कचरा जप्त करण्यासह मोठ्या कारवाईचे नेतृत्व केले. तसेच सुमारे १३ कोटी किमतीच्या १ कोटीहून अधिक परदेशी मूळच्या सिगारेटची अवैध तस्करी रोखण्यात त्यांनी मोठी भूमिका बाजवली .BIS/CDSCO नियमांचे पालन न करणारी खेळणी, सौंदर्यप्रसाधने आणि पादत्राणे जप्त करण्यातहि त्यांचा सहभाग होता. .बंदरे, सीएफएस आणि एसईझेडमधील तस्करी नेटवर्क उध्वस्त करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता , ज्यात १०० कोटींहून अधिक किमतीचे सामान जप्त करण्यात आले आणि १२ प्रमुख गुन्हेगारांना अटक करण्यात आली.
त्यांचे पती व भारतीय महसूल सेवेतील अधिकारी अजिंक्य काटकर , उप संचालक, केंद्रीय जीएसटी गुप्तचर महासंचलनालय,मुंबई यांना ही दोन वर्षा पूर्वी विशेष सेवेबद्दल केंद्रीय अर्थमंत्री मा. श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या हस्ते व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.पंकज चौधरी यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले होते .