एका मोठ्या जीएसटी घोटाळ्यात खरेदी-विक्रीची बनावट बिले सादर करून जीएसटीची फसवणूक केल्याप्रकरणी ॲड साजिद अहमद अब्दुल रऊफ शेख (रा. सोलापूर) याला केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेने १२१ कोटी रुपये दंडाची नोटीस पाठवली. फसवणुकीसाठी कागदोपत्री दाखवलेल्या सुमारे ४०० कंपन्यांची तपासणी सुरू आहे. दंड वसुलीसाठी त्याच्या मालमत्तांची माहिती घेण्याचे काम गुप्तचर अधिकारी करत आहेत.
बनावट कंपन्यांच्या नावाने खरेदी विक्री केल्याची बिले सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभाग, कोल्हापूर शाखेने में २०२५ मध्ये सोलापुरातील वकील साजिद शेख याला अटक केली
होती. गेल्या वर्षभरात गुप्तचर अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. १० ठिकाणी छापे टाकून कागदपत्र, संगणक, लॅपटॉप, मोबाइल जप्त केले. यातून सदर शेख याने १२१ कोटींची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. दंडाची रक्कम तातडीने जमा करावी, अशी नोटीस केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभागाने शेख याला पाठवली.
दंड न भरल्यास त्याच्या मालमत्तांचा लिलाव करून रक्कम वसूल केली जाईल, अशी माहिती तपास अधिकारी वरिष्ठ केंद्रीय गुप्तचर अधिकारी अभिजित भिसे यांनी दिली. अप्पर महासंचालक, सहसंचालक तसेच उपसंचालक आदी ज्येष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. या तपास पथकात गुप्तचर अधिकारी अतुल कुमार जैस्वाल, हिमांशू अहुजा, अविनाश सूर्यवंशी, सौरभ पवार यांचा समावेश होता.
महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये ४०० कंपन्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचे शेख याने कागदोपत्री दाखवले. ५० लाखांपेक्षा जास्त व्यवहार दाखवलेल्या कंपन्यांची तपासणी कोल्हापुरातील केंद्रीय गुप्तचर अधिका-यांकडून सुरू आहे. फसवणुकीचे नेटवर्क चालवणा-या आणखी काही संशयितांचा पर्दाफाश होण्याची शक्यता तपास अधिका-यांनी वर्तवली आहे.
तपासात जप्त केलेल्या संगणकातील डेटाचे फॉरेन्सिक परीक्षण, जीएसटी रिटर्न्स दाखल करण्यासाठी वापरलेल्या आयपी अड्रेसचे तांत्रिक विश्लेषण, आरोपीचा जेलमध्ये नोंदवलेला कबुलीजबाब आणि छापेमारीदरम्यान जप्त केलेली कागदपत्रे या सर्व बाबी तपासात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्या. त्या आधारे शेख याला दंडाची नोटीस पाठवली असून, लाभार्थी कंपन्यांचा तपास
सुरू आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.