कोल्हापूर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून १०.५७ कोटी रुपयांच्या बोगस बिल घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधार अटकेत

GST 4 YOU
कोल्हापूर: करचुकवेगिरी करणाऱ्या आणि बोगस व्यवहारांद्वारे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटविरोधात केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) कोल्हापूर आयुक्तालयाच्या करचोरी विरोधी पथकाने (Anti-Evasion Wing) एक मोठी कारवाई केली आहे. माल किंवा सेवांचा कोणताही प्रत्यक्ष पुरवठा न करता केवळ कागदावर कोट्यवधी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवणे, त्याचा वापर करणे आणि ते पुढे पाठवणे या प्रकरणी मुख्य सूत्रधार कल्पेश कुंभार, घुडेवाडी, आवळी खुर्द, कोल्हापूर (वय ४० ) याला अटक करण्यात आली आहे.
        अधिकृत सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार ही धडक कारवाई कोल्हापूर सीजीएसटी आयुक्तालयाचे आयुक्त  सुमित कुमार यादव आणि करचोरी विरोधी पथकाचे संयुक्त आयुक्त  रोहित जोशी यांच्या  मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त  राम शंकर मीना, अधीक्षक  गौतम कुमार,  स्वप्नील वगरे, अभिषेक रंजन, निरीक्षक मयूर शिंदे आणि हवालदार अजित बोरागे यांनी केली
       या कारवाईची सुरुवात 'मे. रचना ॲग्रो सर्व्हिसेस / निर्मिती इंडस्ट्रीज', शिरोली पुलाची , या फर्मविरुद्ध सुरू झालेल्या गोपनीय तपासातून झाली. विभागाच्या पथकाने केलेल्या सखोल डेटा विश्लेषण आणि प्रत्यक्ष पडताळणीमध्ये केवळ करचोरीच्या उद्देशाने उभारलेले बोगस कंपन्यांचे एक मोठे जाळे समोर आले. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, सदर फर्म'चा प्रोप्रायटर आणि 'मे. निर्मिती कास्टिंग इंडस्ट्रीज' व 'मे. महालक्ष्मी कास्ट इंडस्ट्रीज'चा भागीदार असलेला कल्पेश  कुंभार हाच या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य मास्टरमाइंड होता. त्याने स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि निकटवर्तीयांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून किमान ६ बोगस कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्याही वस्तू किंवा सेवांची प्रत्यक्ष खरेदी-विक्री न करता, केवळ एकमेकांना आणि इतर कंपन्यांना जीएसटीची बोगस बिले जारी केली होती व १०.५७ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) पास केले होते. त्यानुसार कल्पेश कुंभारला अटक करून  मा. न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या बोगस क्रेडिटचा लाभ घेणाऱ्या इतर कंपन्यांचा आणि सहकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीजीएसटीचे पथक पुढील तपास करत आहे.