हा आर्थिक गैरव्यवहार सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत घडला आहे. यातील मुख्य आरोपी प्रकाश लक्ष्मण चव्हाण (रा अहिल्यानगर) हे सेवानिवृत्त सहायक आयुक्त असून त्यांनी निवृत्त होण्यापूर्वी हा अपहार केला. जीएसटी विभागाचे उपायुक्त हेमंत लक्ष्मण गांगे यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगरमधील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी अधिकाऱ्याने स्वतःच्या अधिकृत शासकीय युझर आयडीचा (User ID) चुकीच्या पद्धतीने वापर केला. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याने वेळोवेळी भरलेला १ कोटी ३० लाख रुपयांचा जीएसटी सदर कारखान्याच्या खात्यावर जमा करण्या ऐवजी श्रीगोंद्यातील हॉटेल राजश्री, शिर्डीतील हॉटेल सिद्धांत आणि नाशिकमधील मे. कला एंटरप्रायजेस यांच्या खात्यांवर वळवण्यात आला. चव्हाण यांनी चुकीच्या करदात्यांच्या नावे जमा झालेला कर कारखान्याच्या नावे दाखवून शासकीय यंत्रणेची फसवणूक केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आणि जीएसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.