मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत संवेदनशील आणि वेळेत काम करण्याचे आवाहन केले. नागरिकांना त्यांच्या कायदेशीर कामांसाठी हेलपाटे मारावे लागू नये, याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्या म्हणाल्या. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटी चे अध्यक्ष रवी अगरवाल यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.
नरिमन पॉइंट येथील १३ मजली 'आयकर सिंधू' इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या इमारतीच्या उभारणीसाठी आवश्यक परवानग्या मिळवताना स्वतः प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल, याची अधिक चांगली जाणीव अधिकाऱ्यांना व्हावी, असे त्या म्हणाल्या.
मुंबई आणि नवी मुंबईतील प्राप्तिकर अधिकाऱ्यांसाठी सरकारी निवासस्थानांची कमतरता दूर करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन सीतारामन यांनी दिले. विविध शासकीय विभागांतील जमीन हस्तांतरण आणि मंजुरीची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. बीएसएनएलकडे उपलब्ध असलेल्या जमिनीचा उपयोग करण्याच्या शक्यताही तपासल्या जातील, असे त्या म्हणाल्या