कोचिंग क्लासेस वर वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाचा छापा! कोचिंग शुल्कावरील १८ टक्के जीएसटी चूकवेगिरी तसेच इनपुट टॅक्स क्रेडिटमधील अनियमितता याचा संशय!!

GST 4 YOU
(एआय इमेज)
गोंदिया शहरातील करिअर  कोचिंग क्लासेस च्या दोन शाखांवर वस्तू व कर (जीएसटी) विभागाने छापा टाकला. सदर  कोचिंग क्लासेस चालकांनी जीएसटी नियमांचे उल्लंघन, कोचिंग शुल्कावरील १८ टक्के जीएसटी बुडवल्याचा  संशय, इनपुट टॅक्स क्रेडिटमधील अनियमितता तसेच अघोषित रोख उत्पन्नाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जाते. तपास पथकाने संस्थेची आर्थिक कागदपत्रे, रिटर्न, शुल्काची नोंद, बिलांची पडताळणी आणि अन्य संबंधित दस्तऐवज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. आवश्यक पुरावे सादर करण्याच्या सूचनाही संस्थेला दिल्याची माहिती आहे. 
कोचिंग क्लासेसवर १८% जीएसटी लागू असून खासगी शिकवणी, स्पर्धा परीक्षा, जेईई, नीट, व्यावसायिक प्रशिक्षण तसेच ऑनलाइन शिक्षण (ई-लर्निंग) देणाऱ्या कोचिंग संस्थांवर १८ टक्के जीएसटी लागू होतो. विद्यार्थ्यांकडून शुल्कासह जीएसटीची रक्कम वसूल करून ती शासनाकडे जमा करणे संस्थांसाठी बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांकडून जीएसटीची रक्कम वसूल करून कोचिंग क्लासेस चालकाने ती शासनाकडे न भरल्याचा संशय आहे. बनावट बिले, अघोषित रोख व्यवहार, जीएसटी नोंदणीतील त्रुटी, आदींमुळे ही कारवाई करण्यात आली.
    सदर संस्था ही गोंदिया जिल्ह्यातील मोठ्या कोचिंग क्लासेसपैकी एक मानले जाते. येथे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी सुमारे एक हजार शिक्षण घेत असल्याची माहिती असून  या प्रकरणी जीएसटी विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्याच आधारावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या संदर्भात जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांसह संपर्क साधला असता त्यांनी तूर्तास माहिती देणे टाळले.