बांधकाम व्यावसायिकांत खळबळ - १३ हजार ७८५ रिअल इस्टेट एजंट यांची नोंदणी महारेराने केली रद्द

GST 4 YOU

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण - महारेरा ने नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट आणि एजंट म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांना महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. असे असतानाही मोठ्या संख्येने असलेल्या जुन्या  एजंटनी  नोंदणीचे नूतनीकरणच केले नसल्याचे तसेच त्यांनी  प्रशिक्षण व प्रमाणपत्र न घेतल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. अशा १३ हजार ७८५ दलालांची नोंदणी महारेराने रद्द केली आहे. यात सर्वाधिक एजंट्स ६२९१ हे मुंबई व मुंबई उपनगरातील, तर त्यानंतर ३०७५ ठाणे तर २३४९ हे पुण्यातील आहेत. या सर्वांची माहिती  महारेराने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. 
          या एजंटना भविष्यात जागेच्या खरेदी – विक्रीचे व्यवहार करायचे असतील तर त्यांना विहित प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही, असे महा रेरा ने स्पष्ट केले आले आहे.
       घर, जमीन, गाळे विकणारे आणि खरेदी करणारे यामध्ये दुवा म्हणून रिअल इस्टेट एजंट याना  महारेरा म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण यांनी जारी केलेले सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक केले आहे. प्रमाणपत्राशिवाय खरेदी विक्रीचा व्यवसाय केल्यास महारेरा कडून कारवाई होऊ शकते.
     बिल्डरांच्या व्यवसायासाठी नियंत्रक म्हणुन सरकारने रेरा कायदा  आणला .या तरतुदी अंतर्गत अशा मध्यस्थी करणाऱ्याना नोंदणी करणे बंधनकारक आहे .हे प्रमाण पत्र प्राप्त करण्यासाठी आता थेट ग्राहकांशी संपर्कात असणाऱ्या एजंटना प्रशिक्षण देण्यात येत आहे .जेणेकरून ग्राहकांना प्रकल्प व विकासका बद्दल योग्य माहिती देऊन ग्राहकांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांची फसवणूक टाळण्यात येऊ शकते. तसेच  त्यामुळे एजंटांच्या कार्यपद्धती सुसंगत आणि त्यांना खरेदी विक्रीच्या व्यवहारासंबंधी संपूर्ण कायदेशीर माहिती असायला हवी या उद्देशाने शासनाने हे पाऊल उचलले आहे. यामुळें महारेरा ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय अशा एजंटना मालमत्तेची विक्री करताना मध्यस्थी करता येणार नाही . 
    सदनिका, भूखंड, इमारत किंवा स्थावर संपदा प्रकल्पांच्या विक्री प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कार्यक्षमता,  परिणामकारकता यांची खात्री करून स्थावर संपदा क्षेत्रातील ग्राहकांचे हित जपणे, तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी निवाडा यंत्रणा उभारणे यासाठी स्थावर संपदा नियामक प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.