खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या लखनऊमधील बाजपेयी कचोरी भंडार या बड्या कचोरी विक्री दुकानावर शुक्रवारी दुपारी जीएसटी टीम ने छापा टाकुन मालकाची सखोल चौकशी केली. पथकाने दुकानातील मशीन्स, बिल बुक आणि रजिस्टर जप्त केले. ६ ते ७ जीएसटी अधिकाऱ्यांनी सुमारे चार तास सर्व लेखा तपशील घेतला.
विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुकान मालकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सर्व आर्थिक कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर एक अहवाल तयार केला जाईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्षात किती कर चुकवला गेला आहे हे समजेल. काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक राज्य जीएसटी टीम बाजपेयी कचोरी दुकानात पोहोचली. दुकानात प्रवेश करताच त्यांनी प्रथम बिलिंग मशीन ताब्यात घेतली आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना छाप्याची माहिती दिल्यानंतर, आणि त्यांनी चौकशी सुरू केली. दुकानाबाहेर आणि आत पोलिस तैनात होते, पावत्यांपासून ते संगणक प्रणालीपर्यंत सर्व तपास सुरू होता. या काळात बरेच ग्राहक आले, त्यापैकी काहींनी कचोरी खरेदी करण्याचा आग्रह धरला, परंतु टीमची उपस्थिती पाहून दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना नकार दिला.वातावरण असे होते की लोकांना समजत नव्हते की हा छापा आहे की दुकान बंद आहे. जसजसा वेळ जात होता तसतसे शहरात छाप्याची बातमी पसरू लागली. यानंतर, काही लोक फक्त पाहण्यासाठी येऊ लागले. सुमारे ४ तास चाललेल्या तपासानंतर जीएसटी टीम निघून जाताच, ग्राहकांची गर्दी पुन्हा एकदा कचोरी खरेदी करण्यासाठी पोहोचली. यानंतर, बाजपेयी कचोरी दुकान पुन्हा गजबजले.
खाऊ गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वर्दळीच्या भागात छापा पडल्यानंतर इतर लहान उपहार गृह विक्रेतांमध्ये मध्ये घबराट पसरली. खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या या दुकानात कचोरी खाण्यासाठी हजारो लोक दिवसभर रांगेत उभे असतात, मात्र शुक्रवारी राज्य कर विभागाच्या एसआयबी पथकाला पाहून उभी रांगच नाहीशी झाली नाही तर कर्मचाऱ्यांमध्येही गोंधळ उडाला. राज्य कर विभागाच्या छाप्यात कचोरी स्टोअरची आस्थापना आणि गोदाम यातील सामान जप्त करण्यात आले. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना घोषित विक्री आणि प्रत्यक्ष विक्रीमध्ये जवळपास अनेक पट फरक आढळला. कागदपत्रे जप्त करण्यात येत असून डेटाची जुळवाजुळव सुरू आहे,असे सांगितले गेले.