सोलापूर नंतर आता नागपूर मधून ही मोठा जीएसटी घोटाळा उघड - बनावट ८६ फर्म्सद्वारे ८०० कोटी रुपयांची फसवणूक

GST 4 YOU
सोलापूर नंतर आता नागपूर मधून ही मोठा जीएसटी घोटाळा पुढे आला असून बनावट जीएसटी बिलिंग रॅकेटचे सूत्रधार  साहू बंधू यांनी ८६ बनावट फर्म्सद्वारे ८०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे असे  चौकशीदरम्यान उघड झाले आहे. साहू बंधूच्या कार्यालय आणि घराची झडती घेतली असता पोलिसांना १७ बनावट कंपन्यांचे रबर स्टॅम्प सापडले. या प्रकरणात आणखी तिघेही फरार आहेत. 
        पोलिसांनी संतोष ऊर्फ बंटी रामपाल साहू , जयेश रामपाल साहू , ब्रिजकिशोर रामनिवास मणियार ,ऋषी हितेश लाखानी व आनंद विनोद हरडे  यांना अटक केली आहे .
    प्राथमिक तपासात साहू बंधूंनी तयार केलेल्या काही प्रमुख बनावट कंपन्यांमध्ये विविका एंटरप्रायझेस, कबीर स्टील ट्रेडर्स, साक्षी फूड सप्लायर्स आणि शारदा ट्रेडर्स यांचा समावेश आहे.     साहू बंधूंच्या नातेवाईकांच्या नावावर वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. यावरून साहू बंधूंच्या कुटुंबातील सदस्यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे दिसून येते. बेनामी मालमत्तांव्यतिरिक्त, साहू बंधूंनी एफडी आणि म्युच्युअल फंडांमध्येही कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत.
      बनावट जीएसटी बिलिंग रॅकेटच्या केंद्रस्थानी असलेले  साहू बंधू बरोबरीने  यात सामील ब्रिजकिशोर मनिहार हा स्वतःला जीएसटी कर सल्लागार म्हणून ओळखत होता. त्याला जीएसटी प्रणालीचे व्यापक ज्ञान आणि  माहिती असल्याचे मानले जाते. पोलिस सूत्रांनी सांगितले की, मनिहार हा बनावट बिल खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना संपर्क करून तो त्यांना त्याचा जवळचा सहकारी अंशुल मिश्रा याच्याकडे हे व्यवहार करण्यासाठी निर्देशित करत असे.
    या रॅकेटमध्ये सामील  बनावट कंपन्या कंपन्या संशयास्पद व्यक्तींच्या ओळख पत्रांचा वापर करून नोंदणीकृत केल्या गेल्या होत्या. प्रामुख्याने रोजंदारी कामगार आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील लोकापैकी अनेक व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर  नोंदणी साठी करण्यात आला.मात्र याची माहिती त्यांना नव्हती. तसेच ते कायदेशीर कारवाईच्या भीतीने ते लपून बसले.
     या घोटाळ्यामुळे शेकडो कोटी रुपयांची करचोरी आणि मनी लाँडरिंग झाली असावी असा सूत्रांचा
 अंदाज  आहे. या बनावट संस्थांचे व्यापक ऑडिट केल्यास अधिक आर्थिक विसंगती उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुन्हे शाखा फरार आरोपींना शोधण्यासाठी प्रयत्न तीव्र करत आहे आणि तपासाची व्याप्ती वाढवण्यासाठी जीएसटी विभाग आणि  आर्थिक गुप्तचर संस्थांसोबत समन्वय साधून तपास काम  करत आहे.