फरीदाबाद सीजीएसटी आयुक्तालयाने ६४.२५ कोटी रुपयांचा सुनियोजित इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घोटाळा उघडकीस आणला आहे. या फसवणुकीत प्राथमिक तपासात दोन व्यक्तींचा सहभाग होता असे दिसून आले.
यातील मुख्य आरोपी संकेत मित्तल हा केवळ 19 वर्षाचा असून त्याचा साथीदार नवीन तायल हे सतत त्यांची ठिकाणे बदलून आणि स्वतःची ओळख लपवून बोगस आयटीसी व्यवहार करत होते.
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा घोटाळा सुनियोजित असून ज्यातून डिजिटल जीएसटी फसवणुकींमध्ये एक मोठे स्वरूप पुढे आले असून जिथे सायबर गुन्हेगार ई-कॉमर्स डेटामधील तफावत, बी२सी व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि कागदपत्र पडताळणी प्रणालींतील त्रुटींचा गैर फायदा घेताना आढळून आले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की संकेतने बनावट वीज बिलांचा वापर करून दोन कंपन्या स्थापन केल्या, एक त्याच्या आजीच्या नावावर होती, दुसरी त्याच्या घरातील कर्मचाऱ्याच्या नावावर होती. त्यानंतर आरोपींनी ॲमेझॉन ,फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून आय फोन आयएमइआय (IMEI) क्रमांक मिळवले आणि बनावट बिलांवर हे नंबर वापरून ते बनावट कंपन्यांना विकले गेले आहेत, हे दाखवले आणि त्यातून कर क्रेडिटचा दावा केला.
अधिकारी आयएमइआय कसे मिळवले गेले हे शोधण्याचा प्रयत्नात आहेत.या बिलांची तपासणी करताना, अधिकाऱ्यांनी ॲपल इंडियाशी शी संपर्क साधला, असता आयफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणि नंतर वैयक्तिक खरेदीदारांना विकले गेले आहेत हे आढळून आले. तपासकर्त्यांनी ८,००० हून अधिक आयफोन आयएमईआयचे विश्लेषण केले आणि त्यांचे पुनर्विक्री रेकॉर्ड ट्रेस केले.
"या आयफोनबद्दल आयएमईआय आणि इतर तपशील अॅपल इंडियाकडून घेण्यात आले, ज्यामध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि वैयक्तिक ग्राहकांना केलेली विक्री दिसून आली. या संस्थांकडून या फोनची खरेदीची कोणतीही नोंद नव्हती," असे पुढे त्यांनी सांगितले.
तसेच दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगम या वीज कंपनीने पुष्टी केली की दोन्ही कंपन्यांची स्थापना करण्यासाठी वापरलेली बिले बनावट होती आणि असा कोणताही ग्राहक अस्तित्वात नव्हता. ई-वे बिल विश्लेषणातून असे दिसून आले की आरोपींनी ज्या वाहनांमध्ये फोन वाहतूक केल्याचा दावा केला होता ती वाहने एकतर अवैध होती किंवा त्यांचे नोंदणी क्रमांक यांचा गैरवापर करण्यात आला . तर ५.४ कोटी रुपयांचे आयफोन हरियाणा रोडवेज बसने वाहतूक केल्याचे दाखवण्यात आले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की बनावट इनव्हॉइस आणि सर्क्युलर ट्रेडिंग हुडकून काढण्यासाठी विभाग आता प्रगत डेटा विश्लेषण आणि विभागांमधील चांगल्या समन्वयाचा वापर करत आहे. फरीदाबादमधील नवीनतम कर फसवणूक प्रकरणी तपास सुरूच असून पुढील काही आठवड्यात आणखी अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.