द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे महिन्यात घेतलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, छत्रपती संभाजीनगर येथील राजन काबरा याने देशात प्रथम, तर मुंबईतील मानव शाह याने देशात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. राजन याने ६०० पैकी ५१६ गुण मिळवले; तर कोलकाता येथील निष्ठा बोथ्रा ही देशात दुसरी आली. तिला ५०३ गुण मिळाले. मानव शाहला ४९३ गुण मिळाले.
राजन काबरा हा इंटरमीजिएट व फाउंडेशन परीक्षेतही देशात अव्वल ठरला होता. फाउंडेशन, इंटरमीजिएट व सीए अंतिम परीक्षेत एकाच विद्यार्थ्याने देशात टॉपर येणे हा विक्रम आता राजन काबराच्या नावावर नोंदविला गेला आहे.
देशभरातून ९९,४६६ विद्यार्थ्यांनी यंदा सीएची परीक्षा दिली. यात सीए ग्रुप एकच्या परीक्षेला ६६,९४३ विद्यार्थी बसले होते. त्यातील १४,९७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २२.३८ टक्के निकाल लागला, तर ग्रुप दोनची परीक्षा ४६,१७३ विद्यार्थ्यांनी दिली, पैकी १२,२०४ म्हणजे २६.४३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या निकालानंतर देशपातळीवर १४,२४७ जण चार्टर्ड अकौंटंट म्हणून पात्र ठरले आहेत.