कोल्हापुरात बड्या स्टील उत्पादकावर आयकर विभागा कडून छाप्याची मोठी कारवाई सुरू असून कच्चा माल स्क्रॅप व त्यातून तयार केलेले स्टील उत्पादन यामध्ये मोठी तफावत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आल्याचे समजते. कोल्हापूर येथील स्टील उत्पादन कारखान्यासाठी आवश्यक असणारे स्क्रॅप हे रोख रक्कम देऊन खरेदी केले गेले असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती.
गोवा येथील प्रसिद्ध स्टील उद्योग समूहाच्या संचालकांच्या गोवा, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश येथील कारखाना, निवासस्थान व कार्यालय आदी ठिकाणी
ही कारवाई झाल्याचे समजते. टाकलेल्या आयकर छाप्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आल्याचे समजते. कोल्हापुरातील कारवाईत मोठी रक्कम तसेच सोने जप्त करण्यात आल्याचे समजते. गोवा कोल्हापूर व उत्तर प्रदेश येथील कारवाई अजून सुरूच असून, काही संशयास्पद कागदपत्रे आयकर विभागाने ताब्यात घेतली आहेत.
संबंधित उद्योग समूहाचे प्रमुख यांनी गोवा येथे स्टील उत्पादनाचा कारखाना उभारला. स्टीलचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक कच्चा माल म्हणून स्क्रॅपची खरेदी केली जाते. या स्क्रॅपची खरेदी रोखीने केल्यामुळे अनेक व्यवहारांमध्ये हिशोबाची कागदपत्रे आढळत नाहीत. काही कागदपत्रांमध्ये तफावत आढळून येते. त्यामुळे आयकर विभागाने संबंधित संचालकांचे जबाब घेण्याचे काम सुरू केल्याचे समजते. या कारवाईत आयकर विभागाने संबंधित उद्योग समूहाच्या सहा वर्षांतील अकाउंट्सची माहिती घेण्यास सुरुवात केल्याचे समजते
या स्टील उद्योग समूहाने पूर्वी जीएसटी कर चुकवेगिरी केल्याचे निदर्शनास आल्यामुळे वर्षभरापूर्वी जीएसटी विभागाने या उद्योग समूहावर दंडात्मक कारवाई केली होती.