अबब! रेस्टॉरंटवाल्यांनी केला रु.70 हजार कोटींचा घोटाळा!! आयकर अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी सुरू!! अनेक रेस्टॉरंट चेन्स रडार वर!!

GST 4 YOU
.         हजारो कोटींच्या कर घोटाळ्याच्या चौकशीचे केंद्रबिंदू असलेल्या हैदराबाद येथील बिर्याणी रेस्टॉरंट साखळीच्या आयकर अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतून,  रेस्टॉरंट बिलिंग सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करून सुमारे ७०,००० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल दडवून कर चुकवल्याचे समोर आले आहे
       सूत्रांनी सांगितले की, आयकर विभागाच्या हैदराबाद शहर युनिटने कर चुकवेगिरी च्या संशयांमुळे गेल्या  काही दिवसात रेस्टॉरंट परिसरापासून ते सदर बिर्याणी ब्रँडच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या निवासस्थानांपर्यंत ३० ठिकाणी छापे टाकले. त्या छाप्यांमधून जप्त केलेल्या अनेक खात्यांमधून केलेल्या UPI व्यवहारांसह डिजिटल रेकॉर्डच्या विश्लेषणातून कर अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर घोटाळा असल्याचे आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.
      या बाबत आय कर अधिकाऱ्यांनी देशभरातील १.७ लाखाहून अधिक रेस्टॉरंट आयडी कव्हर करणाऱ्या पीओएस किंवा पॉइंट ऑफ सेल सिस्टम संबंधी अंदाजे ६० टीबी  बिलिंग डेटाचे विश्लेषण करून या चौकशीचा विस्तार संपूर्ण देशाभरातील ऑपरेशनपर्यंत केला, ज्यामध्ये 'हजारो भोजनालये' वापरत असलेल्या एका विशिष्ट बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये 'बल्क डिलीट' फंक्शन असल्याचे आढळून आले, जे संपूर्ण माहिती वगळून टाकते. यात वैयक्तिक बिले हटवणे आणि नंतरच्या  सुधारणां , खाडाखोड सारख्या इतर कार्यांसह, विक्रीचे आकडे दडपण्यासाठी या वैशिष्ट्याचा गैरवापर करण्यात येत असल्याचे सुद्धा अधिकाऱ्यांना आढळून आले.
     अधिकाऱ्यांनी दावा केला की त्यांना बिलिंग रेकॉर्ड पद्धतशीरपणे हटवण्याचे आणि बदलण्याचे पुरावे आढळले आहेत, ज्यामुळे रेस्टॉरंट्सना उलाढाल कमी नोंदवता आली  आणि कर देयता कमी करता आली. सुरुवातीच्या अंदाजानुसार वर्ष २०१९-२० पासून दडपलेली विक्री किमान ७०,००० कोटी रुपयांची होती, ज्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील विक्रीचा समावेश असल्याचा संशय आहे.
       सूत्रांनी सांगितले की, हजारो पॅन किंवा कायमस्वरूपी खाते क्रमांकांमध्ये बिलिंग रेकॉर्ड दडपल्याचे आढळून आले आहे, ज्यामध्ये काही आता १ कोटी रुपयांपेक्षा जास्तची अघोषित विक्री निदर्शनास आली आहे.
        या मोठ्या कारवाईमुळे रेस्टॉरंट क्षेत्रात खळबळ उडाली असून जीएसटी विभागाने याची गंभीर दखल घेतल्याचे सूत्रांकडून समजले.