रु.१४.३१ कोटींचा बनावट जीएसटी परतावा लाटल्याचा ठपका -कोल्हापूर डीजीजीआयकडून उद्योजकावर अटकेची कारवाई

GST 4 YOU
(AI generated image)
वस्तू किंवा सेवांचा कोणताही प्रत्यक्ष पुरवठा न करता केवळ कागदोपत्री व्यवहार दाखवून सुमारे १४.३१ कोटी रुपयांचा बनावट 'इनपुट टॅक्स क्रेडिट' (ITC) लाटल्याप्रकरणी डीजीजीआय (DGGI) कोल्हापूर प्रादेशिक युनिटने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार आणि 'मेसर्स विमल एंटरप्रायझेस'चा तसेच मे. विमल ॲग्रो कंपनी चा मालक समाधान घाडगे (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) याला  अटक करण्यात आली आहे.
        ऑक्टोबर २०२५ मध्ये या कोट्यवधींच्या जीएसटी घोटाळ्यातील समाधान घाडगेचा सहभाग निष्पन्न झाला होता. तेव्हापासून जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालय (DGGI) त्याच्या मागावर होते, मात्र आरोपी अटकेच्या भीतीने फरार झाला होता. अखेर कोल्हापूर पथकाने त्याला अटक केली.
       तपासात मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे याने स्वतः १४.३१ कोटी रुपयांचा बनावट आयटीसी मिळवून त्याचा वापर केला. याशिवाय, त्याने ८.४४ कोटी रुपयांचा बनावट टॅक्स क्रेडिटचा लाभ विविध व्यावसायिकांना (लाभार्थ्यांना) प्रत्यक्षात मालाचा पुरवठा न करता बेकायदेशीरपणे मिळवून दिला. या संपूर्ण कटात त्याला मयंक मुकेश पटेल याने मदत केली होती. मयंक पटेल याला डीजीजीआयने सप्टेंबर २०२५ मध्येच अटक केली आहे.
        ही कारवाई डीजीजीआय, पुणे विभागीय युनिटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरच्या पथकाने केली. या पथकामध्ये वरिष्ठ गुप्तचर अधिकारी सुरज पवार,अभिजित भिसे, तसेच गुप्तचर अधिकारी सौरभ पवार आणि अतुल कुमार यांचा समावेश होता. या गुन्ह्यामध्ये आणखी कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत आणि हा घोटाळा किती मोठा आहे, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे