अंकुश कुमार सुरेशचंद बगरेचा (वय 34, रा. आचलनगर, कोंढवा) आणि मोहित शिवकुमार तोडी (वय 33, रा. कोंढवा बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी प्राधिकरण येथील तन्मयी सुहास देसाई यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बगरेचा आणि तोडी यांनी त्यांच्या 'एम.एस. ओडी अँड असोसिएट्स' या फर्मच्या माध्यमातून सन 2022 ते 2026 या कालावधीत इतर साथीदारांच्या मदतीने हा घोटाळा केला. शेल कंपन्यांच्या व्यवहारांशी संबंधित अधिकृत कागदपत्रे सादर न करता किंवा त्यांची योग्य तपासणी न करता, परदेशात पैसे पाठवण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म 15 सीबीचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यानंतर ही बनावट प्रमाणपत्रे खरी असल्याचे भासवून आयकर विभागासमोर सादर करण्यात आली. तसेच, फॉर्म 15सीए तयार करण्याचा अधिकार नसतानाही आरोपींनी तो तयार करून आयकर विभागाच्या पोर्टलवर अपलोड केला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन कंपन्यांना आर्थिक फायदा मिळवून दिल्याचा आरोप आहे.
संबंधित तीन कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 4,427 कोटी रुपये परदेशात पाठवण्यात आले. या रकमेवरील कर चुकवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास सुरू आहे. परदेशात पाठवण्यात आलेल्या रकमेचा मूळ स्रोत, संबंधित बँक खाती, पैसा कोणत्या देशात पाठवण्यात आला, तसेच तीन कंपन्यांच्या संचालकांची भूमिका याचा तपास पोलीस करत आहेत.